Dry Eye / डोळ्यांची काळजी

डोळे मिचकावणं विसरलेली पिढी — स्क्रीन टाइम, ड्राय आय आणि MGD

Long hours on screens are a common cause of digital eye strain and dry eye in Kharadi, because blinking can drop from about 20 times a minute to about 5. That evaporative pattern is often meibomian gland dysfunction, which we treat as dry eye treatment in Pune after a gland scan. This Marathi article by Dr Swapnil Bhalekar explains डोळे कोरडे होणे, when MGD treatment still helps, and the blink habit that belongs with ड्राय आय उपचार पुणे.

  • dry eye
  • MGD
  • screen time
  • BlinkBreak
तुम्ही शेवटचं कधी डोळे मिचकावले? – dry eye and screen time, EYON Pune

तुम्ही शेवटचं कधी डोळे मिचकावले? आठवत नसेल, तर तुम्ही एकटे नाही…

डॉ. स्वप्निल भालेकर, नेत्रतज्ञ, शिरूर

पुढची साथ हवेतून नाही, स्क्रीनमधून येणार आहे

एक प्रयोग करा. हा लेख वाचताना तुम्ही शेवटचं कधी डोळे मिचकावले, ते आठवा. आठवत नसेल, तर तुम्ही एकटे नाही.

निसर्गाने आपल्याला मिनिटाला १५ ते २० वेळा डोळे मिचकावण्याची सवय दिली आहे. ही सवय इतकी सहज आहे की आपण तिचा विचारही करत नाही. पण मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे एकटक पाहताना हा वेग मिनिटाला ५ ते ७ वर येतो, आणि जे मिचकावणं होतं, तेही अर्धवट. पापण्या पूर्ण मिटतच नाहीत.

कोरोनाने आपल्याला शिकवलं की एक छोटीशी गोष्ट दुर्लक्षित राहिली तर ती जगभर पसरते. आम्ही डोळ्याचे डॉक्टरदेखील आजकाल पाहतोय — डोळे मिचकावणं ही आपण विसरत चाललेली पहिली शारीरिक सवय आहे, आणि त्याची गंभीर किंमत आपले डोळे मोजत आहेत.

ओपीडीमध्ये रोज काय दिसतं

अठरा वर्षांपूर्वी ड्राय आय म्हणजे साठीनंतरचा त्रास होता. रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रिया, संधिवाताचे रुग्ण, क्वचित एखादा वयस्कर गृहस्थ.

आज माझ्या ओपीडीमध्ये येणारा ड्राय आयचा रुग्ण २५ वर्षांचा आयटी इंजिनिअर असतो, १६ वर्षांचा नीटची तयारी करणारा मुलगा असतो, किंवा दिवसभर व्हिडिओ कॉलवर असणारी तिशीतली आई असते.

आणि हा त्रास सौम्य नसतो. आम्ही मायबोमियन ग्रंथींचं (पापण्यांच्या कडेला असलेल्या तेलग्रंथी) स्कॅन करतो, तेव्हा पंचविशीतल्या तरुणांच्या पापण्यांमध्ये ग्रंथी आटलेल्या, तुटलेल्या, काही ठिकाणी नाहीशाच झालेल्या दिसतात. वैद्यकीय भाषेत याला मायबोमियन ग्लँड डिसफंक्शन (MGD) म्हणतात.

दहा वर्षांपूर्वी महिन्यातून एखादा असा गंभीर रुग्ण दिसायचा. आज दररोज दिसतात.

बहुतेकांना स्वतःला त्रास आहे हे कळलेलंही नसतं. ते 'डोळे जड वाटतात', 'संध्याकाळी लाल होतात', 'नंबर बदलला का ते पाहायला आलोय' असं सांगतात. चष्म्याचा नंबर तोच असतो. आटलेलं असतं ते डोळ्यांवरचं अश्रूंचं संरक्षक आवरण.

Blink rate drops from 20 to 5 per minute on screens – EYON Eye & Laser Institute Kharadi

डोळे मिचकावणं इतकं महत्त्वाचं का

डोळ्यांवर अश्रूंचा एक पातळ थर असतो, आणि तो तीन पदरांचा असतो. आतला श्लेष्माचा पदर, मधला पाण्याचा पदर, आणि सर्वात वरचा तेलाचा पदर. हा तेलाचा पदर पापण्यांच्या कडेला असलेल्या मायबोमियन ग्रंथींमधून येतो. वरच्या-खालच्या पापणीला मिळून अशा सुमारे ५० ते ७० ग्रंथी असतात.

तेलाचा हा पदर पाण्याचं बाष्पीभवन थांबवतो, जसं कढईत तेलाचा थर असेल तर खालचं पाणी लवकर आटत नाही.

ही ग्रंथी तेल स्वतःहून बाहेर सोडत नाही. प्रत्येक पूर्ण मिचकावण्याच्या वेळी पापणी ग्रंथीला दाबते आणि तेलाचा एक थेंब बाहेर पडतो. डोळे मिचकावणं हा त्या ग्रंथीसाठी पंपाचं काम करतं!!

आता स्क्रीनकडे पाहताना काय होतं ते पाहा. मिचकावण्याचा वेग तिपटीने कमी होतो. जे मिचकावणं होतं तेदेखील अर्धवट, पापणी ग्रंथीपर्यंत पोहोचतच नाही. तेल बाहेर येत नाही, ग्रंथीत साचून घट्ट होतं, टूथपेस्टसारखं. साचलेली ग्रंथी हळूहळू सुजते, मग सुकते, मग नाहीशी होते. वर तेल नाही, म्हणून खालचं पाणी आटतं. आणि कोरडा डोळा चोळला की सूज, सूज की आणखी कोरडेपणा.

हे चक्र एकदा सुरू झालं की स्वतःहून थांबत नाही.

हा फक्त डोळ्यांचा त्रास नाही, रोजच्या जीवनावर याचे गंभीर परिणाम होतात!

ड्राय आयचा रुग्ण अंध होत नाही, म्हणून या आजाराला कोणी गंभीर मानत नाही. पण जे रुग्ण रोज भेटतात ते काय सांगतात ते ऐका.

  • 'दुपारी तीननंतर मी स्क्रीनकडे पाहूच शकत नाही, कामं रात्री उरकावी लागतात.'
  • 'एसी ऑफिसमध्ये तासाभरात डोळे जळायला लागतात, मी मीटिंग टाळतो.'
  • 'गाडी चालवताना रात्री समोरच्या दिव्यांचा झगमगाट सहन होत नाही.'
  • 'मुलाला पुस्तक वाचून दाखवता येत नाही, पंधरा मिनिटांत डोळे भरून येतात.'
  • 'लोकांना वाटतं मी रडतेय किंवा झोपलेली नाही, सतत डोळे लाल असतात.'

अभ्यासांमध्ये तीव्र ड्राय आयचा जीवनमानावरचा परिणाम मध्यम स्वरूपाच्या हृदयविकाराच्या वेदनांइतका मोजला गेला आहे. डोकेदुखी, चिडचिड, झोपेचा त्रास, कामातली कार्यक्षमता कमी होणं, आणि डोळ्यांत कायम काहीतरी खुपतंय ही भावना. हे सगळं एका न दिसणाऱ्या, कोणाला न सांगता येणाऱ्या त्रासामुळे.

दुर्लक्ष केलं तर काय होतं

इथे एक गोष्ट स्पष्ट सांगायला हवी. आटलेली मायबोमियन ग्रंथी परत उगवत नाही.

सुरुवातीच्या टप्प्यात ग्रंथी फक्त साचलेली असते. तेव्हा गरम शेक, पापण्यांची स्वच्छता, मिचकावण्याची सवय बदलणं आणि गरज पडल्यास थर्मल पल्सेशनसारखे उपचार केले तर ग्रंथी पुन्हा काम करू लागते. हा टप्पा पूर्णपणे उलटवता येतो.

पण वर्षानुवर्षं साचलेली ग्रंथी आतून आकसते आणि जागी व्रण राहतो. स्कॅनमध्ये ती काळी पट्टी म्हणून दिसते, जिथे ग्रंथी असायला हवी तिथे काहीच नसतं. अशा डोळ्याला कायमचा कोरडेपणा येतो. मग थेंब आयुष्यभर घालावे लागतात, तेही पुरेसे पडत नाहीत. काही रुग्णांत बुबुळावर जखमा होतात आणि दृष्टी धूसर होते.

पंचविशीत झालेली ग्रंथींची हानी पन्नाशीत कशी दिसेल, हे पाहणारी ही पहिलीच पिढी आहे. म्हणूनच आज सावध होणं गरजेचं आहे, नंतर उशीर होण्यापेक्षा!!

डिजिटल डोळ्यांसाठी सात नियम

स्क्रीन सोडा असं सांगण्यात अर्थ नाही, ती आता आपल्या कामाचा आणि जगण्याचा भाग आहे. पण स्क्रीनसोबत जगण्याचे नियम असतात, जसे गाडी चालवण्याचे असतात.

  1. २०-२०-२० चा नियम दर २० मिनिटांनी २० सेकंद, २० फूट (सुमारे ६ मीटर) लांबच्या वस्तूकडे पाहा. फोनवर टायमर लावा, सवय लागेपर्यंत.
  2. स्क्रीन नजरेच्या खाली ठेवा स्क्रीन डोळ्यांच्या पातळीपेक्षा थोडी खाली असेल तर पापण्या अर्ध्या मिटलेल्या राहतात आणि डोळा कमी उघडा राहतो, बाष्पीभवन कमी होतं. लॅपटॉप खूप उंच आणि मोबाईल डोळ्यांसमोर धरणं टाळा.
  3. एसी आणि पंख्याची हवा थेट चेहऱ्यावर नको कारमधला एसी व्हेंट खाली वळवा. ऑफिसमध्ये थेट एसीखाली बसणं टाळा.
  4. पाणी प्या दिवसभरात २.५ ते ३ लिटर.
  5. डोळे चोळू नका चोळण्याने पापण्यांची सूज वाढते आणि ग्रंथी आणखी बंद होतात. खाज आली तर थंड पाण्याने धुवा.
  6. झोपण्यापूर्वी एक तास स्क्रीन बंद अंधारात मोबाईल पाहताना मिचकावण्याचा वेग सर्वात कमी असतो.
  7. मुलांच्या स्क्रीनवर मर्यादा दोन वर्षांखाली शून्य, शाळकरी मुलांना दिवसाला एक तासापेक्षा जास्त नाही, आणि मैदानात किमान एक तास रोज.

याशिवाय स्क्रीन वापरणाऱ्या प्रत्येकाने वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करावी, फक्त नंबरची नाही, पापण्यांची आणि अश्रूंच्या थराची. आता पापण्यांच्या ग्रंथींचं स्कॅन करणारी यंत्रं उपलब्ध आहेत, त्यात ग्रंथी किती टिकल्या आहेत हे प्रत्यक्ष दिसतं.

डोळे मिचकावायचे कसे

हा प्रश्न विचित्र वाटेल, पण बहुतेक लोक चुकीचं मिचकावतात. अर्धवट, घाईने, पापण्या एकमेकींना स्पर्शही न करता. मिचकावणं हा स्नायूंचा व्यायाम आहे आणि तो पुन्हा शिकता येतो.

पूर्ण मिचकावण्याचा व्यायाम (दिवसातून चार-पाच वेळा, प्रत्येकी एक मिनिट):

  1. डोळे हळू मिटा, जणू झोपायला जाताय.
  2. मिटलेले ठेवून दोन सेकंद थांबा.
  3. आता पापण्या हलकेच दाबा, जसं कोणी डोळे मिटून काही आठवतं. दोन सेकंद.
  4. हळू उघडा.
  5. हे दहा वेळा करा.

तिसऱ्या पायरीतला हलका दाब महत्त्वाचा आहे. तोच ग्रंथीतलं तेल बाहेर काढतो. हा व्यायाम रोज केल्यास तीन-चार आठवड्यांत बहुतेकांना फरक जाणवतो.

डोळे मिचकावण्याची आठवण कशी ठेवायची

स्क्रीनच्या कोपऱ्याला एक छोटा ठिपका किंवा चिकटपट्टी लावा. नजर तिथे गेली की एक पूर्ण मिचकावणं. फोनचा पासवर्ड टाकताना, मेसेज पाठवण्याचं बटण दाबताना, मीटिंगमध्ये कोणी बोलायला सुरुवात केली की. अशा रोजच्या क्रियांना मिचकावणं जोडलं की ते आपोआप होऊ लागतं.

सोबत रोज रात्री

स्वच्छ रुमाल गरम पाण्यात भिजवून पिळा आणि मिटलेल्या पापण्यांवर पाच मिनिटं ठेवा. तेल पातळ होतं आणि ग्रंथी मोकळ्या राहतात. थंड झाला की पुन्हा गरम करा.

शेवटी

मिचकावणं फुकट आहे. त्याला उपकरण लागत नाही, वेळ लागत नाही, डॉक्टर लागत नाही. पण ते विसरलं तर जे गमावतो, ते कोणत्याही उपकरणाने परत आणता येत नाही.

हा लेख वाचून झाला की एक पूर्ण, सावकाश मिचकावणं करा. आणि ज्याचे डोळे संध्याकाळी लाल होतात, अशा तुमच्या ओळखीच्या एका व्यक्तीला हा लेख पाठवा. त्यांच्या ग्रंथी अजून वाचवता येऊ शकतात!!

डॉ. स्वप्निल भालेकर

MBBS MS PGI FLVEPI CORNEA

कॉर्निया व ड्राय आय तज्ज्ञ

𝗘𝗬𝗢𝗡 𝗘𝘆𝗲 & 𝗟𝗮𝘀𝗲𝗿 𝗜𝗻𝘀𝘁𝗶𝘁𝘂𝘁𝗲, खराडी, पुणे

𝗩𝗶𝘀𝗶𝗼𝗻 𝗖𝗮𝗿𝗲 𝗖𝗲𝗻𝘁𝗲𝗿, शिरूर

This article is for general information and does not replace advice from your eye doctor. Treatment is planned only after a full eye examination, and results vary from person to person.

Dr. Bhalekar offers dry eye analysis and MiBo Thermoflo treatment at EYON Eye and Laser Institute.

पापण्यांच्या ग्रंथींचं स्कॅन आणि Dry Eye Suite (MiBo Thermoflo) EYON मध्ये उपलब्ध — अपॉइंटमेंटसाठी 90 90 99 33 99 / 90 90 99 11 99

Book a consultation